'कवडसे पकडणारा कलावंत' हे मराठी साहित्यातील एक नावीन्यपूर्ण पुस्तक आहे. देशोदेशींच्या कथा व कथाकार हा पाडळकरांच्या आवडीचा व अभ्यासाचा विषय आहे. श्री. पाडळकरांनी ह्या ग्रंथात श्रेष्ठ कथाकार अंतोन चेकॉव्हचे जीवन व त्याच्या कथा यांचे रसग्रहणपूर्वक विश्लेषण केले आहे. चेकॉव्हच्या दोनशेहून अधिक कथांचा अभ्यास करुन, तसेच त्याची चरित्रे, आठवणी, पत्रव्यवहार यांचा धांडोळा घेत पाडळकरांनी हा ग्रंथ सिद्ध केला आहे. उणेपुरे ४४ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या चेकॉव्हच्या जीवनातील नाट्यपूर्ण घटना व त्यांच्याशी समांतर, एक कथाकार म्हणून त्याचा होत गेलेला विकास याचे चित्रण करताना कलावंताच्या अंतरंगातील माणूस शोधण्याचा प्रयत्न पाडळकर तरल संवेदनशीलतेने व एकाग्र चिंतनाने करतात. पाडळकरांची निखळ जीवननिष्ठा त्यांना या अभिनव शोधात मूल्यविवेकापासून ढळू देत नाही. चेकॉव्हचे मोठेपण करुनही त्याच्या मनुष्यपणाला पडलेल्या चिरांकडे देखील पाडळकर तेवढ्याच साक्षेपाने वाचकांचे लक्ष वेधतात. साहित्य अधिक मार्मिकतेने समजावे व जीवनातील अर्थगर्भतेचे आकलन व्हावे अशी धारणा असणा-या रसिकांना व अभ्यासकांना हे पुस्तक आश्वासक वाटेल.
Author: Vijay Padalkar | Publisher: Majestic Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 230