गणेशची कथा वास्तववादी, आधुनिकोत्तर, महानगरी अशा कोणत्याही एका डब्यात बंद करता येत नाही, हे तिचं महत्वाचं वैशिष्ट्य. या कथेत आशयाच्या अनुषंगाने काही सामाजिक मुद्दे येत असले तरी ही कथा हल्ली प्रतिष्ठित असलेल्या सामाजिक वास्तववादापासून दूर आहे. तिला कल्पनाशीलतेचं वावडं नाही. पण मानवी आयुष्य आणि त्याच्यावर परिणाम करणारे विविध घटक या कथांच्या आशयाच्या केंद्रस्थानी आहेत. या कथांचे ताणेबाणे अशा घटकांच्या ताणातून आणि सैलावण्यातून विणले गेले आहेत. ही कथा रुढार्थानं सुरुवात, मध्य आणि शेवट अशी तीन अंकी रचना अनुसरत असली, तरी या रचनेच्या हाताळणीत एक खास ताजेपणा आहे. या कथेच्या बंदिशीत एक चिरेबंद नेमकेपणा आहे. कथेला दीर्घ करण्याच्या हव्यासापायी येणारी पाल्हाळिक रटाळ वर्णनं या कथेत दिसणार नाहीत.
गणेश कथेमध्ये लोकप्रिय साहित्यप्रकारांची रहस्य, भय, गूढता अशी तत्वं परिणामकारकतेनं वापरतो. पण त्यांचा वापर केवळ वाचकाला रंजवण्यापुरता किंवा वाचनीयता वाढवण्यापुरता नसतो. तर कथेच्या गंभीर आणि बहुआयामी आशयाकडे नेणाऱ्या त्या वाटा असतात. रंजकता आणि वाचनीयता हा अवगुण मानला जाणाऱ्या काळात ही कथा आशयघन वाचनीयतेमुळे वेगळी उठून दिसते. गणेशची कथा अंदाजसुलभ (predictable) नाही. त्याची एक कथा वाचल्यावर पुढची कथा अमुक प्रकारची असेल अशी अटकळ बांधता येत नाही. या कथांमधले सामाईक आशयघटक शोधता येतात. मात्र त्यांच्या स्वरुपात, अभिव्यक्तीत प्रत्येक कथेत काहीतरी वेगळेपण असतं. त्यामुळे या कथेला समीकरणांत बंदिस्त करता येत नाही.
या कथांना महानगरी जाणीवेच्या कथा असं चलनी विशेषण सहज लावता येईल. पण तसं करणं त्यांच्या आशयाच्या व्याप्तीवर अन्यायकारक ठरेल. त्या महानगरात घडणाऱ्या, पण मानवी जाणीवेच्या कथा आहेत. या जाणीवा मूलभूत मानवी अस्तित्वाशी निगडित आहेत. मानवी नातेसंबंधांचे विविध स्तर आणि गुंते, स्मृतीचा वर्तमानावर होणारा परिणाम, निवडीचं स्वातंत्र्य आणि अपरिहार्यता असे आशयघटक गणेशच्या ‘खिडक्या, अर्ध्या उघड्या’ या पहिल्या कादंबरीपासून त्याच्या फिक्शनमध्ये आलेले आहेत. आता गणेशची कथा अधिक गडद, बहुकोनी आशय व्यक्त करताना दिसते. तिचा घाट जास्त चिरेबंद होतो आहे. ती विविध कथाघटकांचं एकत्रीकरण करुन नवी वाट शोधताना दिसते. म्हणूनच गणेशच्याच नव्हे, तर समकालीन मराठी कथेतला हा महत्वाचा टप्पा आहे.
~ निखिलेश चित्रे
Author: Ganesh Matkari | Publisher: Majestic Publishing House | Language: Marathi | Binding: Hardcover | No of Pages: 206