मंगला गोडबोले या लेखिकेच्या लेखणीतून उतरलेले हे एक उत्कृष्ट पुस्तक.
आडवळण
“बाबीताईऽ... मम्मी... ममा गं...!” रस्त्याच्या पलीकडून पियूची बुलंद हाक आली तशी बाबीताई आणि अंजना ह्या दोघींचा जीव एकदमच भांड्यात पडला. उद्यमनगरच्या बसस्टॉपवर उतरल्याला त्यांना अर्धा तास झाला होता तरी पियूचा पत्ता नव्हता. एवढ्या वेळात ‘तू तिला नक्की कळवलंयस ना?’ हा प्रश्न नवव्यांदा आणि ‘निरोपाच्या तारखेचा काही घोळ नाही ना?’ हा प्रश्न चौदाव्यांदा विचारून बाबीताई थकली होती; आणि तिला थोपवता-थोपवता अंजना आणखीच भागली होती. उशिराने का होईना, पण रस्त्याच्या पलीकडून काळ्याभोर केसांचं एक टोपलं त्यांच्या दिशेनं घरंगळत येताना दिसायला लागलं तेव्हा दोघींमध्ये एकदम चैतन्य आलं. क्षणार्धात ते टोपलं बाबीताईला येऊन धडकलं आणि एका हाताने केस मागे सारून दुसऱ्या हाताने बाबीताईला गदागदा घुसळत पियू चीत्कारली, “बाबीताई... माझी बाबुडी... तायुडी...’’ ‘एऽ पुरे ना! हा रस्ता आहे.” ‘‘असू दे! तू भेटल्याचा आनंद मी त्यांच्यासाठी का लपवू? हाय ममा ऽऽ, कशी आहेस. किती वेळ झाला येऊन? बसमध्ये काही त्रास नाही ना झाला?” ‘‘आमचं राहू दे गं! तुझं सांग. तू कशी आहेस?’’ “मस्त! तुम्हाला कशी दिसत्येय?’’ “पूर्वीसारखीच. आपल्याकडे टँकवरून पोहून आल्यावर दिसायचीस तशी.” ‘‘कमॉन बाबीताई. मी पोहून नाही काही आल्येय. झोपून उठल्या-उठल्या तशीच पळत सुटले एवढंच.” “झोपून उठलीस? आता साडेदहाला?’’ “हो ना! आज तुमच्यासाठी जरा लवकर उठावं लागलं नाहीतर कधीकधी अकरा पण होतात.” ‘‘अगं पियू? आता संसारी बाई ना तू..’’ “मग काय झालं? पराग फॅक्टरीत जाईपर्यंत गडबड असतेच गं सकाळची. मग निवांत! मी काय करते, त्याच्याबरोबर मी पण गरमागरम टोस्ट-बटर, कॉफीचा ब्रेकफास्ट हाणते. तो कामाला गेला की आपण झोपायचं. आता एवढं खूप खाल्ल्यावर झोप येणारचं ना माणसाला? त्यात रात्रीची रोजची जागरणं गंऽ... आई गं...!” अंजनाच्या हातातली छत्री पियूच्या पायावर पडल्यामुळे ती क्षणभर विव्हळून थांबली. पण ती छत्री मुळी चुकून पडलीच नव्हती. पियूचा जागरणाचा विषय थांबावा म्हणून अंजनानेच ती हलकेच पाडली होती. आपली नवपरिणित कन्यका मोठ्या मावशीसमोर रात्रीच्या जागरणांबद्दल इतकं बिनधास्त बोलेल हे तिच्या ध्यानीमनी नव्हतं. पण पियूच्या बिनधास्तपणामुळे तिला आयुष्यभरच धास्तावून राहावं लागत होतं त्याला कोण काय करणार? पियू आणि बाबी ताई अजून काय धम्माल करतात...ते आवर्जून वाचा.
Author: Mangala Godbole | Publisher: Utkarsh Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 152