महाराष्ट्राला इतिहास संशोधकांच्या परंपरेतील वा.सी. उर्फ वासुदेव सीताराम बेंद्रे हे एक महत्त्वाचे नाव आहे. संशोधक, लेखक म्हणून बेंद्रे यांची कारकिर्द मोठी आहे. ९० वर्षांच्या वाटचालीत त्यांनी ५७ हून अधिक इतिहास ग्रंथसंपदा निर्माण केली. वयाच्या ८० व्या वर्षी ‘राजाराम महाराज चरित्र’ प्रकाशित करून कामावरील निष्ठा व्यक्त करणारे बेंद्रे हे वेगळेच विद्वान होते. छत्रपती राजाराम महाराजांच्या बेंद्रे लिखित ग्रंथाचं प्रकाशन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री. यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते झालं होतं. आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीत बेंद्रेंचा मोठा वाटा आहे. भारत इतिहास संशोधन मंडळाला संस्थात्मक स्वरूप प्राप्त करून देण्यात त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. ऐतिहासिक कागदपत्रांचा गाढा अभ्यास असल्याने त्यांच्याकडे पेशवे दफ्तरातील ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन करण्याची जबाबदारी दिली होती. त्यांच्या या संशोधनातून प्रसिद्ध झालेली ग्रंथसंपदा गेली अनेक वर्षे दुर्मिळ झाली होती. अशा या ग्रंथमालेतील बेंद्रे यांनी लिहिलेले सहा ग्रंथ नुकतेच प्रकाशित झाले आहेत. ‘मालोजीराजे आणि शहाजी महाराज’,‘छत्रपती शिवाजी महाराज’ (पूर्वार्ध व उत्तरार्ध), ‘शिवराजाभिषेक प्रयोग’,‘छत्रपती संभाजी महाराज’ आणि 'छत्रपती राजाराम महाराज' हे सहा ते सहा ग्रंथ होय. बेंद्रे सतत कार्यमग्न असायचे. अगदी तरुणपणी ते जेंव्हा पुण्याला आले तेव्हा सरकारी नोकर तर ते होतेच, स्टेनोग्राफर होते आणि भारत इतिहास मंडळाशीही संलग्न होते.वि.का.राजवाडे यांना गुरुस्थानी मानून संशोधनाचे काम त्यांनी सुरू केले व आपल्या गुरूंचीच संशोधनाचीच परंपरा पुढे चालविली.
Author: Vasudeo Sitaram Bendre (V. S.Bendre) | Publisher: MarathiDesha Foundation | Language: Marathi | Binding: Hardcover | No of Pages: 664