हे पुस्तक पेरियार ई. व्ही. रामासामी नायकर (१७ सप्टेंबर १८७९ ते २४ डिसेंबर १९७३) यांच्या तात्त्विक व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देते. धर्म, देव आणि मानवी समाजाचे भवितव्य हे पेरियारांच्या तात्त्विक विचारांचे मध्यवर्ती पैलू राहिले आहेत. मानवी समाजाच्या संदर्भात धर्म आणि देव यांच्या भूमिकेचे त्यांनी सखोल असे चिंतन केले आहे. या चिंतनातून आलेले निष्कर्ष या पुस्तकातील विविध लेखांमध्ये मांडण्यात आले आहेत. या पुस्तकातील लेख पेरियार यांच्या तात्त्विक व्यक्तिमत्त्वाचे विविध आयाम वाचकांसमोर मांडतात. हे वाचून सहज समजू शकते की, पेरियारांसारख्या तत्त्वज्ञानी-विचारवंताला केवळ नास्तिक म्हणणे म्हणजे त्यांच्या प्रगल्भ आणि बहुआयामी विचारसरणीला नाकारणे होय.
हे पुस्तक दोन भागात विभागलेले आहे. पहिल्या भागात समाविष्ट केलेले व्ही. गीता आणि ब्रजरंजन मणी यांचे लेख पेरियार यांच्या विचारसरणीचे विविध पैलू वाचकांसमोर मांडतात. त्यातच देव आणि धर्माशी संबंधित पेरियार यांचे मूळ लेखन देखील आहे, जे त्यांच्या देव आणि धर्माच्या संकल्पना स्पष्ट करतात.
पुस्तकाच्या दुसऱ्या भागात पेरियार यांच्या विश्वदृष्टीशी संबंधित लेख संग्रहित करण्यात आले असून त्यात त्यांनी तत्त्वज्ञान, वर्चस्ववादी साहित्य इत्यादी प्रश्नांवर चर्चा केली आहे. या लेखांमध्ये पेरियार यांनी तत्त्वज्ञान म्हणजे काय आणि समाजात तत्त्वज्ञानाची भूमिका काय आहे हे सविस्तरपणे सांगितले आहे. पेरियार यांचा भविष्यातील जग कसे असेल याचा तपशीलवार वैचारिक आणि ऐतिहासिक निबंधही दुसऱ्या भागात आहे.
Author: E V Ramasami Periyar | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 182