"म्या दारूला शिवलो न्हाई. शप्पत सांगतो, मी घेतल्याली न्हाई. उगा इनाकारणी माज्यावर अदावत घेऊ नका." राऊ खोतानं साफ झिडकारलं तशी ती सारी चावडी खालवर झाली. लोक खदाखदा हसू लागले आणि राऊ खोतच म्हणाला, "हसून दावू नका. खरं सांगतो. मी घेतल्याली न्हाई." रामभाऊ हसून म्हणाले - "गड्या, तुझ डोळं सांगत्यात की रं!" "अण्णा, डोळं काय सांगत्यात? गपा, उगच गप्प् बसा." "उतरंस्तवर गप् बसावं म्हणतोस व्हय राऊ?" "अहो, काय चढलीया काय मला?" "अजून चढली न्हाई म्हणतोस?" "अहो, त्याचं नावसुदिक घेऊ नगा. शिवल्याला न्हाई म्या त्याला!" एक सनदी पुढं झाला आणि मोठ्यानं म्हणाला, "शिवल्यालं न्हाई, तर मग दडून का बसला होतास?" "शेबास! मी काय दडून बसलो होतो काय?" "दडला नव्हतास तर मग माळ्यावर काय करत होतास?" "माळ्यावर काय करतोय! गडद झोपलो होतो?" "मग खाली जागा नव्हती काय?" "ते तुम्हाला काय करायचं? आम्ही खाली झोपू न्हाईतर वर झोपू!" राऊ असं आडवं बोलला आणि सबंध चावडी पोट धरून हसू लागली.
Author: Shankar Patil | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 130