इस्राईलमधलं नावीन्य, कल्पकता, तिथल्या परिसंस्था आणि जगभरातल्या अब्जावधी लोकांचं जगणं सुकर करण्याकरता या देशानं उचललेल्या सिंहाच्या वाट्याविषयी माझ्या सहकाऱ्यांनी आणि मित्रमंडळींनी मला सांगितलं. अशा मित्रमंडळींचा सहवास लाभल्यामुळे मी स्वतःला भाग्यवानच समजतो. या आणि अशाच अनेक लोकांच्या जिज्ञासू वृत्तीमुळे आणि औदार्यपूर्ण सहकार्यामुळेच मी हे पुस्तक लिहू शकलो. पुस्तकनिर्मितीचा हा संपूर्ण प्रवासही अतिशय प्रेरणादायी होता. शंभराहून अधिक लोकांच्या मुलाखतींतून हे पुस्तक साकारलं आहे. नवकल्पनाकार, मुख्य कार्यकारी अधिकारी, धोरणकर्ते, सैन्यदलांचे सदस्य, सेवाभावी संस्थांचे अधिकारी, अभियंते, कम्प्युटर प्रोग्रॅमर्स, बँकर्स, जोखीम भांडवलदार, थिंक टँक्स अशा कितीतरी जणांचा या मुलाखतींत समावेश आहे. या सगळ्यांनाच मानवी समाजाच्या उन्नतीसाठी पूरक ठरलेल्या, इस्राईलच्या कल्पक, नवतेचा ध्यास घेऊन केलेल्या प्रवासाचा सार्थ अभिमान आहे, समाधान आहे. हे पुस्तक लिहायचं ठरवलं, तेव्हापासून अवीव आणि ईनात एझरा हे दोघंही या पुस्तकाचे अविभाज्य घटक झाले. या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मला अमूल्य सहकार्य केलं. संपर्क साधण्यासाठी, संसाधनं उपलब्धतेसाठी मदत केलीच, शिवाय ते सतत पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. हा प्रकल्प पूर्ण करताना आलेल्या सगळ्या चढ-उतारांत ते माझ्या सोबत होते आणि म्हणूनच मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे.
Author: Avi Yorish | Publisher: Menaka Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 198