गेल्या काही वर्षात भारतात राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती, राष्ट्रद्रोह या बाबतच्या चर्चा
अधिकाधिक जोमाने होताना दिसतात. तसेच त्या चर्चा न राहता, दोन टोकांच्या भूमिकांत
असलेल्या वितंडाच्या पातळीवर जाताना दिसतात. उदाहरणार्थ, भारत हे राष्ट्र गेली हजारो
वर्षे अस्तित्वात होते अशी एक बाजू आहे तर त्याच्या विरोधात भारत नावाचे राष्ट्र १५
ऑगस्ट १९४७ रोजी अस्तित्वात आले अशी दुसरी बाजू आहे; मानवी जीवनात राष्ट्र ही
संकल्पना अत्यंत लाभदायक आहे आणि सर्वांत आदरणीय असली पाहिजे अशी एक बाजू
आहे, तर त्याच्या विरोधात राष्ट्र ही संकल्पना, निदान तिच्या आक्रमक आविष्कारात,
अत्यंत घातक आणि हिंसक अशी संकल्पना आहे अशी दुसरी बाजू आहे. राष्ट्रवादाचे
समर्थन करणाऱ्या उजव्या संघटना पहिली बाजू मांडतात तर रविंद्रनाथ टागोर हे दुसरी बाजू
मांडणाऱ्यांच्यातले एक प्रसिद्ध नाव होते.
आधुनिक अर्थाने राष्ट्र ही संकल्पना नक्की काय आहे; ती इतिहासातील विविध टप्प्यांवर
धर्म, भूगोल, संस्कृती, राजेशाही इत्यादींभोवती संघटित असलेल्या समुदायांपासून वेगळी
आहे किंवा कसे? ती वेगळी असेल तर कशा प्रकारे ? तिचे या आधीच्या समुदायांशी काही
नाते होते किंवा कसे? या बाबतची विविध भूमिकांची धारणा वेगवेगळी आहे हेही वितंड
उद्भवण्यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे.
आधुनिक राष्ट्रवाद या संकल्पनेबद्दल इमॅजिन्ड कम्युनिटिज नावाच्या पुस्तकात बेनेडिक्ट
अँडरसन यांनी सर्वप्रथम पथदर्शी मांडणी केली असे जगभरात मानले जाते. या पुस्तकात
मांडल्या गेलेल्या मूलभूत विचारांचे महत्त्व आजही सर्वत्र मान्यताप्राप्त आहे.
हे विचार भारतात आजच्या काळात लोकांपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातून
या बाबतच्या इथल्या चर्चाविश्वाला काही चौकट प्राप्त होऊन ते अधिक अर्थवाही होईल
असा विश्वास वाटतो.
Author: Benedict Anderson | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 264