हत्ती राघोबादादांच्या तंबूपाशी पोहोचला. बाई अंबारीतून खाली उतरल्या. तोपर्यंत सर्व प्रमुख मराठे सरदार तेथे येऊन पोहोचले. राघोबादादा तंबूबाहेर येऊन सामोरे गेले. अहिल्याबाईंनीही त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला. तंबू पेशव्यांच्या इतमामाला साजेसा मोठा होता. अहिल्याबाईंबरोबर सर्व प्रमुख मराठे सरदारही आत शिरून बाजूला उभे राहिले. सजवलेल्या चौरंगी आसनावर अहिल्याबाई आसनस्थ झाल्या. समोरून काही अंतरावर राघोबादादा बसले होते. त्यांचेही काही सरदार बाजूला उभे होते. "खाविंद इतक्या लांब का येणे केलेत?" अचानक आलेल्या प्रश्नाने राघोबादादा क्षणभर गांगरलेच. मग अगदी दुःखी आवाज काढून म्हणाले - “गंगाजळ निर्मळ मातोश्री आपला पुत्र गेला. आपल्या सांत्वनासाठी आम्ही आलो होतो. आपण पेशवा गादीचे निष्ठावंत आणि आम्ही येऊ नये? ईश्वरी इच्छा. आपण धीर धरावा. " वगैरे अशा प्रकारचे बोलणे दादांचे चालू होते. दादा कशाकरिता आले होते ते बाई पूर्ण जाणून होत्या. बराच वेळ बोलल्यावर म्हणाले, आपण इतके लांब येण्याची तसदी घेतलीत. आम्ही आलो असतो महेश्वरी. ठीक आहे आपली भेट झाली, क्षमाकुशल झाले. आता आम्ही निघावे म्हणतो.” अहिल्याबाईंच्या लक्षात आले होते, दादांनी पूर्ण शरणागती पत्करली आहे. आता जास्त ताणण्यात अर्थ नाही. निघाल्या. अहिल्याबाईंनी दादाचा यथायोग्य सत्कार केला व विजयी मुद्रेने महेश्वरकडे रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या आत्मिक बळावर कपटी राघोबांना शरण आणले. बुद्धिबळाच्या पटावर हत्तीने वजीरावर मात केली.
Author: Dilip Barve | Publisher: Dilipraj Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 89