रात्रीची बाराची वेळ. थकली-भागली मुंबई शांततेच्या मिठीत मुसमुसून झोपलेली. फुटपाथवरचे भिकारी पोटाशी पाय घेऊन थंडीचा प्रतिकार करीत का होईना, झोपले आहेत. बंगल्यातल्या मऊ-मऊ रजया अंगाभोवती गुरफटल्या गेल्यायत. झोप!... सर्व दुःखांवर, मानसिक त्रासांवर एकमेव व स्वस्त उपाय... झोप. एकदा स्वतःवर तिचा अंमल चढविण्यात यशस्वी झालात, की तुम्ही तुमचे राजे! बेइमान, स्वार्थी दुनियेपासून स्वतःच्या स्वप्नील दुनियेत जाऊन पोचण्याचं एकमेव माध्यम. त्या दुनियेत राग नाही, लोभ नाही, प्रेम नाही, तिरस्कार नाही... काहीच नाही! सारं कसं शांऽ त... शां ऽ ऽ त ! ज्याला झोप वश नाही, तो अभागी जीव. पण, मुंबईत असे अभागी जीव फार कमी. सूर्योदयापासून घाम गाळायला केलेली सुरुवात ही एक प्रकारे रात्रीच्या झोपेची आराधनाच. म्हणूनच मुंबई शांतपणे झोपली होती. त्या शांततेचा भंग झाला; पण तो फार थोड्या जणांना जाणवला. दखल तर कोणीच घेतली नाही. ज्यांना त्या आवाजाने झोपेत व्यत्यय आल्यासारखं वाटलं, त्यांनी फक्त कूस बदलून नाराजी व्यक्त केली. ती अॅम्बॅसिडर होती. ताशी १२० किलोमीटरनं ती मुंबईचे रस्ते मागे टाकीत होती. आयुष्यातल्या आनंदाच्या क्षणाप्रमाणे रस्ते भराभर मागे पडत होते! वळणावरसुद्धा फार वेग कमी न करता वळाली; तेव्हा मात्र ड्रायव्हर सोडून सगळे हादरले.. "अबे रसूल, जरा धीरे चलाना! वरना सब के सब मौत के घाट उतर जाएँगे!" डोळ्यावर काळी पट्टी बांधून एक डोळा नाही, असे भासविणारा एक जण म्हणला
Author: Suhas Shirvalkar | Publisher: Dilipraj Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 152