एकनाथबाबानं गाव लेकरागत जपला. त्याच्यासारखा माणूस पुन्हा होणार नाही, म्हणून गाव रडलं. त्या सूर्यापोटी हा शनी जन्मला... सुंद्रा माळिणीसारख्या कैक जणांचे तळतळाट त्याच्या माथी होते आणि तरीही तो तेच करीत होता. त्याचं लक्षण खोटं होतं. चिंचाळ्यातली बरी दिसणारी एक बाई सोडली नाही. कुणाच्या जमिनी व्याजात बळकावल्या. कुणाच्या मोटेची चालती बैलं सोडून आणून आपल्या गोठ्यात बांधली.
कुणाच्या मळ्यातली झाडं तोडून तिसऱ्याच्या जागेत अरेरावीनं स्वत:चे इमले उठविले! चिंचाळ्याची उभी रयत त्यानं गांजली. गरीब गाव नाडलं, पिडलं. बापाची पुण्याई, ढीगभर पैका, सरकारदरबारी वजन ह्यामुळं मनातून जळणारं गाव अजून गप्प होतं. पण असं ते किती दिवस गप्प राहणार? इतक्या जणांचे तळतळाट माथ्यावर असताना तो किती दिवस जगणार! धनदौलत, परंपरा कशी जपणार? इनामदाराच्या घराण्याचा वंशवेल कसा वाढणार??
Author: Vyankatesh Madgulkar | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 136