तीन हजार टाके (Teen Hajar Take)

By: Sudha Murty (Author) | Publisher: Mehta Publishing House

Rs. 220.00 Rs. 210.00 SAVE 5%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

लेखिकेस ज्या ज्या व्यक्तींनी त्यांच्या आयुष्याचे निरनिराळे पदर उलगडून दाखवले, आणि त्यांचा अनुभवाचा घडा ज्ञानानं भरला, त्या अनुभवांचे कथन त्यांनी या पुस्तकातून केले आहे. जसे की, ‘तीन हजार टाके’ या लेखातून त्यांनी देवदासींच्या आयुष्यातील समस्या व त्यांचे निराकरण करण्याचे ठरविल्यावर त्यांना काय अनुभव आले, त्याविषयी लिहिले आहे. सुरवातीला त्या देवदासींना मदत करण्यासाठी गेल्या असता, देवदासींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. कारण सामाजिक कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी त्यांना सुसंवाद साधण्यासाठी लागणारी कौशल्यं आत्मसात करावी लागणार होती. आपला पेहराव, संभाषणची भाषा गरजू लोकांसारखी बदलायला हवी होती. पण या सर्वांहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे आपण करत असलेल्या कामावर मनापासून प्रेम करावं लागणार होतं याची जाणीव त्यांच्या वडिलांनी त्यांना करून दिली. त्याप्रमाणे त्यांनी स्वतःत बदल घडवले. त्यानंतर त्यांनी देवदासींची संघटना बांधून त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशाची सोय व वगैरे मार्ग काढले. याबद्दल त्यांचा गौरव करताना त्या देवदासी भगिनींनी आपल्या प्रेमाची ऊब देणारे टाके प्रत्येकीने विणून अशा तीन हजार टाक्यांचे भरतकाम केलेल्या गोधडीची भेट दिली. ‘मुलांवर मात’या लेखातून लेखिकेने त्यांच्या काळातील शैक्षणिक परिस्थितीत मुली इंजिनिअरिंगच्या शिक्षणापासून कशा दूर होत्या, त्यामुळे त्या कॉलेजमध्ये त्या एकट्याच असल्याने, मुले प्रथम कशी त्यांच्या खोड्या काढायची याविषयी लिहिले आहे. पण नंतर इंजिनिअरिंग हे पुरुषांचं क्षेत्र आहे, हे साफ खोटं असल्याचं सिद्ध करून दाखवलं. लेखिकेनं सगळा अभ्यास व्यवस्थित समजून केला, व त्यांच्याबरोबर शिकणाऱ्या मुलांपेक्षा अधिक गुण मिळवून त्यांच्यावर कशी मात केली, त्याविषयी वर्णन केले आहे. लेखिका एकदा सहजच मैत्रिणीच्या घरी गेली असता, फक्त मूळ भारतीय असलेल्या अन्नपदार्थांपासूनच श्राद्धाचा स्वयंपाक केला जातो, असं त्यांना कळलं. आपण ज्या गोष्टींना ‘भारतीय’ म्हणतो, त्यांपैकी अनेक गोष्टी भारतीय नाहीत. मिरची, ढबू मिरची, मका, शेंगदाणे, काजू, विविध प्रकारच्या शेंगा, बटाटा, पपई, अननस, सीताफळ, पेरू, चिकू या सर्व भाज्या आणि फळं दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आल्याचं त्यांच्या मैत्रिणीच्या वनस्पतिशास्त्रज्ञ वडिलांनी त्यांना सांगितलं. त्याबद्दलच्या विस्मयकारक पौराणिक व वैज्ञानिक गोष्टीही त्यांनी लेखिकेस सांगितल्या. अशा तऱ्हेने जेवायला गेल्या असता वैचारिक खाद्यही त्यांना लाभले. ‘तीन ओंजळी पाणी’ या लेखात लहानपणी आजीबरोबर लेखिका गंगापूजनाला गेली असता, त्याविषयीची माहिती- ते का करतात, कसं करतात हे कळतं. काही वर्षांनी प्रत्यक्ष काशी-बनारसला गेल्यावर त्याविषयीचा तिचा अनुभव काय, याविषयी लेखिकेने या लेखात लिहिले आहे. ‘घरासारखं दुसरं काही नाही’ या लेखात लेखिकेला मध्यपूर्वेत महिला संघटनांच्या आमंत्रणावरून गेल्या असता, स्वतःजवळचे सर्व पैसे घालवून, अधिक पैसे मिळतात, या आशेने गेलेल्या महिलांवर तेथे गेल्यावर काय परिस्थिती ओढवते, व परत मायदेशी येणे किती मुश्किल होते, याविषयी लेखिका सजग करते. ‘खरा राजदूत’ या लेखात परदेशी गेल्यावर आपली हिंदी सिनेसृष्टी इतर देशांमध्ये आपल्या देशाविषयी, संस्कृतीविषयी कशी उत्सुकता निर्माण करते, तेथील लोकांशी जोडले जाण्याचा अनुभव देते, याची झलक दिसल्यावर चकित होते, त्याविषयी लिहिते. ‘रसीला आणि पोहोण्याचा तलाव’ या लेखात कर्नाटकातील हरिकथेत सांगितल्या जाणाऱ्या कृष्णाच्या आणि गोपिकांच्या रासलीलांच्या गोष्टी आपल्या परदेशातल्या नातींना लेखिका सांगते. याच गोष्टी परदेशी वातावरणाशी जुळवून त्यांच्या नाती त्यांना कशा मार्मिक रीतीने सांगतात, हे वाचणे खूपच रंजक आहे. ‘इन्फोसिस फाउंडेशनमधील एक दिवस’ या लेखात लेखिकेची मैत्रीण ‘तिला लेखिका निवांत भेटत नाही’ अशी तक्रार करते, तेव्हा त्या मैत्रिणीलाच आपल्या कामाच्या ठिकाणी बोलवते, व तिचा दिनक्रम कसा व्यस्त आहे, याचा अनुभव दिवसभर देते. ‘मला जमणार नाही; आपल्याला जमेल’ या लेखातून लेखिकेचा अचानकच व्यसनाधीनांच्या व्यसनांपासून सुटकेसाठी काम करणाऱ्या ‘अल्कोहोलिक अॅपनॉनिमस’ या संस्थेच्या संपर्कात आली. त्यांचे काम कसे चालते, याविषयीच्या मीटिंगला उपस्थित राहण्याची संधीही लेखिकेस मिळाली. त्याविषयीची समस्या सोडवण्यासाठी वाचकास जागृत करणारा, अंगावर शहारा आणणारा अनुभव लेखिकेने आपल्यासमोर ठेवला आहे. एकूणच समाजातील समस्या, माहिती, ज्ञान, चालीरीती अशा सगळ्या कंगोऱ्यांना स्पर्श करणारे रंजक पण विचार करायला भाग पाडणारे विषय लेखिकेने समर्थपणे हाताळले आहेत.

Details

Author: Sudha Murty | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 152