श्रीनगरहून उड्डाण
बालमित्रांनो, तुमचा दोस्त बनेश ऊर्फ फास्टर फेणे जवानांच्या भेटीसाठी युद्धभूमीवर गेला होता : चक्क पॅराशूटमधून हे पार्सल आघाडीवर पडलं हे तुम्हाला माहीत आहे. हिमालयाची हाक त्याला कायमची येत असते आणि काश्मीर म्हणजे त्याला दुसरा महाराष्ट्र वाटतो हेही तुम्हाला सांगायला नको. काश्मीरला त्याने दोन वेळा भेट दिली आहे. एकदा युद्धकाळात अन् एकदा शांततेच्या काळात. या दुसर्या खेपेस त्याला त्याच्या मामा-मामींनी आपल्याबरोबर नेले होते. भलत्या भानगडीत पडणार नाही, सरळ वागेन, असे निघण्यापूर्वी मामांनी त्याच्याकडून वचन घेतले असूनही तुफान धाडसात गुंतणे त्याला भाग पडले होते. फास्टर फेणे तरी बिचारा काय करणार? तो जिकडे जातो तिकडे संकटे त्याला सलामी देण्यासाठी दुतर्फा हारीने उभी असतात हे आपण पाहतोच आहो. असो. त्या सहलीत फास्टर फेणेने काश्मीरचे खोरे दणाणून सोडले आणि एका बमबाज हेराला पकडून देऊन इन्स्पेक्टर ओमप्रकाशकडून शाबासकी मिळवली हे तुम्हाला आठवत असेल. त्या धुडुम धाडसात त्याची मामेबहीण माली अन् काश्मिरी दोस्त अन्वर यांनी त्याला खूप मदत केली आणि तरी बापड्या फा. फे. चा कडेलोट होऊन त्याची हाडे मोडली. एका आठवड्यात ती पुन्हा जुळली म्हणा. जुळायला हवीच होती. एरवी ही मंडळी मुंबई-पुण्याकडे परतणार कशी? तो क्षण तर अगदी जवळ आला होता. पण बन्या बरा होतो न् होतो तो दुसरेच काहीतरी अप्रूप घडले आणि बन्या-माली एकटीच—म्हणजे-दुकटी-काश्मीरहून परतीच्या प्रवासाला निघाली. तो रिटर्नचा किस्सा मी तुम्हाला अजून सांगितलेला नाही. सांगेन सांगेन म्हणतो अन् विसरून जातो. कारण तुमच्याइतकी माझी आठवण आता धड राहिलेली नाही. पण तो परतीचा एपिसोड किंवा अध्याय भलताच रोमांचकारी होता. तेव्हा आज आलीच आहे याद तर सांगतो. नीट कान टवकारून ऐका.
Author: B. R. Bhagwat | Publisher: Utkarsh Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 152